सांगली : राज्यात सांगली लोकसभा मतदारसंघाने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. विशाल पाटील यांनी सांगलीत बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही जागा चर्चेचा विषय ठरत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे.

महाविकास आघाडीतल्या वादामुळे सांगली लोकसभेची जागा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाने कोणत्याही सल्लामसलतीशिवाय पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले. त्यामुळे काँग्रेसचे नेते अत्यंत नाराज झाले.यावर महाविकास आघाडीत बरेच दिवस चर्चासत्र सुरु होते. अखेर अंतिम जागावाटपात ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उभे राहिले आहेत. याचा धक्का मविआला पोहोचणार असून निवडणुकीत सांगलीमध्ये मविआचं नुकसान होणार आहे. त्यामुळे मविआने विशाल पाटलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

विशाल यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव टाकला जात आहे.विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी, ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारात उघड किंवा गुप्तपणे उतरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल यांची माघार हा कळीचा मुद्दा बनवला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा, अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये असे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.