कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे  स्वयंचलित दरवाजे बंद झाले. यापैकी तीन नंबरचा दरवाजा आज (शुक्रवार) १०.१० मिनिटांनी बंद झाला. त्यापाठोपाठ सहा नंबरचा दरवाजा १०.३७ मिनीटांनी बंद झाला आहे. तर जिल्हा प्रशासनाकडील अहवालानुसार १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने सुरू आहे.

शहर आणि जिल्हयात होत असलेल्या परतीच्या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी नऊ वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी २६ फूट ४ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, खडक कोगे,  कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली, चावरे, कोडोली, तांदूळवाडी, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे सोळा बंधारे पाण्याखाली आहेत.

आज पहाटेपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळी कमी होत आहे. अलमट्टी धरणात ११८.८९६ आणि कोयना धरणात १०३.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा : तुळशी ९८.१०, वारणा ९७४.१९, दूधगंगा ७१९.१२, कासारी ७६.९९, कडवी ७१.२४, कुंभी ७६.५२, पाटगाव १०५.२४, चिकोत्रा ४३.१२, चित्री ५३.४१, जंगमहट्टी ३४.६५, घटप्रभा ४४.१७, जांबरे २३.२३ अशी आहे.