मुंबई : नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स निर्देशांकाने ६१ हजार अंकांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३२७ अंकांच्या तेजीसह ६१,१६८ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९२ अंकांच्या तेजीसह १८,१९७ अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील दिवसभरातील व्यवहार करणाऱ्या २२५४ कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, १२४५  कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. १७७ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारातील आज दिवसभरातील व्यवहारात मेटल्स स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. मेटल्स स्टॉक्समध्ये तीन टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिअल्टीच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तेजी दिसली. चीनने देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी निर्यात शुल्कात वाढ केली. त्याच्या परिणामी मेटल्सच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली आहे.