नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी आज झाली. पक्षातंर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नये, अशी विनंती आयोगाला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. आता या मुद्द्यावरील पुढील सुनावणी निवडणूक आयोगात शुक्रवार, दि. २० जानेवारी होणार आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुखपदाची मुदत २३ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे दुहेरी कात्रीत ठाकरे गट सापडला आहे.

कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना म्हणाले की, ‘त्यांनी शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. शिवसेनेतील हा फुटीर गट नाही. शिंदे गटाला काही अर्थ नाही. खरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच आहे. शिवसेनेत फूट हे कपोकल्पित काल्पनिक बाब असल्याचे सिब्बल म्हणाले. शिंदे गट हे वास्तव नाही, शिवसेनेच्या घटनेचे आयोगात वाचन करण्यात आले. फुटलेल्या आमदारांनी स्वतःहून पक्ष सोडला,’ असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी आहेत. शिंदे गटाच्या याचिकेमध्ये अनेक त्रुटी आहेत. शिंदे गटाचे बंड पक्षाच्या अवस्थेवर परिणाम करणारे नाही. चिन्हावर निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करु नये, असेही सिब्बल यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे मुद्दे ठाकरे गटाने खोडून काढले. शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा सिब्बल यांचा दावा. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नये. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्या. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

शिंदे गटाची बाजू मांडताना वकील महेश जेठमलानी म्हणाले, ‘आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. आमच्याकडे संख्याबळ आहे. आमदार, खासदारांचे बहुमत जास्त असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय लवकर घ्या, अशी मागणी जेठमलानी यांनी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींसह एक मोठा गट पक्षातून बाहेर पडला तर तो बेकायदेशीर कसा, असा सवला त्यांनी उपस्थित केला. शिंदे गटाच्या कागदपत्रात त्रुटी नाही, ठाकरे गटाचा आरोप चुकीचा असे जेठमलानी यांनी म्हटले आहे. मोठ्या संख्येने पक्षातून लोकप्रतिनिधी बाहेर पडतात, यात तथ्य आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले.