शाहुवाडी (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये इतकी थेट आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर करावी. अशा विविध मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या सरकारने विधानसभेच्या निवडणुकी वेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीचे नुसते आश्वासन दिले होते. या गोष्टीला जवळपास वर्ष उलटून गेले तरी या विषयावर कोणताही निर्णय या सरकारने घेतलेला नाही. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे, महागडी खते व औषधांच्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हा बँका आणि सावकारांच्या कर्जाच्या ओझ्याखाली अडकला असून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू लागला आहे.
त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे.पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवून विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला त्वरित द्यावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शाहुवाडी यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्ता पवार, उपतालुकाप्रमुख दिनकर लोहार, योगेश कुलकर्णी, पांडुरंग रवंदे, अलका भालेकर, पुनम भोसले, कार्यकर्ते उपस्थित होते.