मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला. कोकाटे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शुक्रवारी हा प्रवेश केला. भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने कोकाटे नाराज असल्याची चर्चा होती. माढ्यामधून आता कोकाटेंना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, राज्यात सर्वत्र सत्तेच्या माध्यमातून दबाव टाकून पक्षात घेण्याचे काम सुरू आहे. सन २०१९मधील निवडणुकीमध्येही असेच सुरू होते. नागरिक याला कंटाळले असून या लोकसभा निवडणुकीची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. माढ्यामध्ये जर तुम्ही पक्ष संघटना बळकट केलीत, तर तुम्हाला कोणीही आव्हान उभे करू शकणार नाही. पक्ष मधल्या काळामध्ये संकटात होता; परंतु आता हळूहळू सत्तेसाठी फुटून बनलेल्या पक्षातील अनुभव येत असल्याने हे लोक पुन्हा मूळ पक्षाशी जोडले जात आहेत,’ असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले,‘आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. तर दुसऱ्या बाजूला सत्तारूढ पक्षांकडे कंत्राटदार आहेत. आमच्या पक्षात एखाद्याने प्रवेश केला, तर त्यांच्या मागे तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले, सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील आदींचाही पक्षप्रवेश झाला.