मुंबई  (प्रतिनिधी) : शरद पवार नाराज आहेत हे धादांत खोटं आहे. हे तुम्हाला हे कोणी सांगितले. शरद पवार यांनी फोन करून सांगितले आहे का? ‘मी रोज साहेबांच्या संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात कोणी अशी भर घातली? असा आक्रमक प्रश्नही अजित पवार यांनी पत्रकारांना केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरला म्हणून जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अजित पवारांनी संयम दाखवला. या घटनेनंतर अजित पवार यांच्या या संयमी भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. शरद पवारांच्या या नाराजीच्या चर्चेसंबधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले की, ‘तुम्हा पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज मिळत नाही म्हणून तुम्ही अशा बातम्या पसरवता. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करता. मी विरोधी पक्षनेता आहे मला माझे काम कळते. मी दूधखुळा नाही. मी ३२ वर्षांपासून राजकारण समाजकारण करणारा माणूस आहे. त्याच्यावरून माझी काळजी करू नका.