शाहुवाडी ( प्रतिनिधी ) : शाहूवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे पंचायत समिती शाहूवाडीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांना विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनमान्य वेतन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दिवाळी निमित्त दोन पगार व बोनस देण्यात यावा, तसेच राहणीमान भत्ता ₹३४१० प्रति महिना मंजूर करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. तसेच प्रायव्हेट फंड कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात यावा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने देण्यात यावीत, अशी मागणीही संघटनेने केली.

या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदा सोने, उपाध्यक्ष संपत पाटील, सचिव संदीप पाटील, तसेच पदाधिकारी विशाल मोरे, निलेश कांबळे, रेश्मा कळंत्रे, रावजी पाटील, सचिन दळवी, सिताराम गवळी, प्रियंका वारंग, विद्या पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.