मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चेमुळे मंडलिक यांच्या मुरगूड येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून घडत असणाऱ्या राजकीय घडामोडीत आज राज्यातील शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. आज लोकसभेत तसे पत्र हे १२ खासदार लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत व आपला लोकसभा गटनेता राहुल शेवाळे हे असणार आहेत हेही पत्राद्वारे कळवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील या १२ खासदारांना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या घरी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यानुसार खा. संजय मंडलिक यांच्या मुरगूड येथील निवासस्थानी पोलिस तैनात केले आहेत.