कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) अंतिम वर्षात शिकणाऱ्या १५ विद्यार्थ्यांची ‘हॉटेल सयाजी’ आणि ‘टाटा स्टारबक्स’ या नामांकित ब्रँडमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. या दोन्ही कंपनीच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे ही निवड करण्यात आली आहे.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी.एस.सी इन हॉस्पिटॅलिटी हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. यामध्ये विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. व्यक्तिमत्व विकासावर भर देऊन इंटरव्ह्यूची तयारीही विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येते.

या महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९ विद्यार्थ्यांची हॉटेल सयाजीमध्ये निवड झाली आहे. हॉटेल सयाजी ग्रुपकडून देशाच्या विविध शहरामध्ये १४ पंचतारांकित हॉटेल्स चालवली जातात. ‘स्टारबक्स’ कंपनीमध्ये महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा समूहाचे देशभरात १०० हून अधिक ‘स्टारबक्स’ आऊलेट आहेत.

हॉटेल मॅनेजमेंटमधील परिपूर्ण ज्ञान देणाऱ्या बी. एस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडिज या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देश-परदेशातील पंचतारांकित हॉटेल्स, क्रूझ, टूरीझम कंपनी, रीटेल, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या भरपूर संधी आहेत. २०२२-२३ साठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे प्राचार्य रुधिर बारदेस्कर यांनी म्हटले आहे.

विविध कंपनीमध्ये निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी अभिनंदन केले आहे.