मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच बघतो. आता  लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता लवकरच आम्ही मराठी तुला थोबडवनार, अशी धमकी मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याला दिली आहे.

बिग बॉसच्या १४ व्या पर्वात जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. मला मराठीची चीड येत असल्याचे जान कुमार सानूने म्हटले आहे. त्याच्या या विधानावर सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर शिवसेना- मनसेच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मुजोर जान कुमार सानू याची बिग बॉस स्पर्धेतून हकालपट्टी केली नाही. तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तर जान कुमार सोनू याच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमेय खोपकर यांनी धमकीवजा इशाराच दिला आहे.