कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वाढून आलेल्या वीजबिलासाठी सवलती, शेती पंपाच्या वीज बिलांची माफी,  अनेक शेतकऱ्यांना जाहीर करून न दिलेले ५० हजार रुपयांचे अनुदान,  महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा शासन आदेश काढून ही न केलेली अंमलबजावणी या मागण्यांबाबत आणि  राज्य सरकारच्या फसव्या धोरणांविरोधात   भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज (बुधवार) लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली.

दसरा चौकातील छ. शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर समरजितसिंह घाटगे यांनी सकाळी ९ वाजता उपोषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यानंतर भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांनीही घाटगे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.