कोल्हापूर (प्रतिनिधी) : सैफ सेंटर हे संशोधक विद्यार्थ्यांसाठी अनोखे केंद्र बनले असल्याचे प्रतिपादन प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी केले. शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या आठवडी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी झालेल्या सर्व शिक्षक संशोधक विद्यार्थी यांना प्रथम सत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. संभाजी पवार यांनी सोलर सेल या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यातील विविध संकल्पनांचा विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये कसा उपयोग करावा याबाबतची सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. डी. एस. भांगे यांनी एक्सआरडी या उपकरणावर नमुने तपासणी विषयी तपशीलवार माहिती दिली.

या स्तुती कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी डी. वाय. पाटील संस्थेचे डॉ. जे. एल. गुंजकर यांनी ‘नॅनो हायब्रीड मटेरियल’ विषयी माहिती दिली. ऊर्जा आणि पर्यावरणीय विषयांसाठी नॅनो हायब्रीड मटेरियलचे उपयोग याविषयी देखील चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. ए. व्ही. घुले यांनी ‘ॲडव्हान्सेस ओन थर्मल अनालिसिस’ वर मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व सहभागी शिक्षक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांना सैफ डीएसटी सीएफसी येथील उपकरणांचे गटानुसार प्रात्यक्षिक दिले गेले.

सहभागींपैकी काहींनी आणलेले सॅम्पल देखील येथे टेस्ट करून दिले. याच प्रकारे दररोज संध्याकाळी विविध उपकरणे सहभागींना प्रत्यक्षपणे हाताळायला मिळणार आहेत. अशा प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांना सहजासहजी हाताळायला मिळत नाही; परंतु स्तुती कार्यक्रमाच्या अंतर्गत ही संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. प्रा. आर. जी. सोनकवडे हे सर्वोत्तम स्तुति समन्वयकांपैकी एक आहेत. जे आपल्या भूतकाळातील वैज्ञानिक आणि प्रशासकीय अनुभवाचा वापर करून स्तुति अंतर्गत खूप चांगले कार्यक्रम आयोजित करत आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी भारत सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि विशेष करून प्रा. सोनकवडे यांचे विशेष आभार मानले.