मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ पुढील वर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसह विश्वचषक २०२४ ची सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या टी-२० संघाचा भाग नसल्याचे सांगण्यात येत आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. 

नव्या निवड समितीच्या स्थापनेनंतर त्याच्याकडे औपचारिकपणे टी-२० कर्णधारपद सोपवण्यात येणार आहे.  भारताच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंचा यापुढे टी-२० संघात समावेश होणार नाही. बीसीसीआयने रोहित, विराट कोहली, मोहम्मद शमी, आर. अश्विन, दिनेश कार्तिक यांना अनौपचारिक संभाषणात कळवले आहे की, ते यापुढे भारताच्या टी-२० संघात समाविष्ट होणार नाहीत.

भारत जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. महत्वाच्या खेळाडूला संघात संधी दिली जाणार नाही. केएल राहुल देखील या मालिकेत खेळणार नाही कारण तो लग्न करणार आहे. डिसेंबरमध्ये नवीन निवड समितीची नियुक्ती केली जाणार आहे. जे भारतीय संघाबाबतचे सर्व औपचारिक निर्णय घेईल; पण काही नावांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे हे निश्चित आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा झाली आहे. ते बीसीसीआयच्या निर्णयासोबत आहेत.