मुंबई (प्रतिनिधी) : माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ३६ वे अध्यक्ष झाले आहेत. बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये बिन्नी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते आता सौरव गांगुलीची जागा घेणार आहेत. यासोबतच भाजपचे नेते आशीष शेलार यांची आता ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध नियुक्ती झाली आहे. ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईतील ताज हॉटेलमध्ये पार पडली ज्यामध्ये ‘बीसीसीआय’ सचिव जय शाह, माजी अध्यक्ष सौरव गांगुली, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, अरुण सिंह धुमल आणि माजी भारतीय क्रिकेटर रॉजर बिन्नीदेखील उपस्थित होते.

६७ वर्षीय रॉजर बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. बिन्नी हे भारतीय क्रिकेट संघात खेळणारे पहिला अँग्लो-इंडियन खेळाडू ठरले. अष्टपैलू बिन्नी यांनी १९७९ मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध राष्ट्रीय संघातून पदार्पण केले. बिन्नी भारतीय संघासाठी २७ कसोटी आणि ७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. रॉजर बिन्नी यांनी आपला शेवटचा सामना ९ ऑक्टोबर १९८७ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

दरम्यान, ‘आयसीसी’मध्ये ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधी म्हणून जय शहा यांना पसंती मिळण्याची शक्यता असल्याने एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. शहा यांची पुन्हा ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी, राजीव शुक्ला यांनी उपाध्यक्षपदी, तर आशीष शेलार यांनी कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

बीसीसीआयने आयसीसी अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करायचा की विद्यमान ग्रेग बार्कले यांना दुसऱ्या टर्मसाठी पाठिंबा द्यायचा की नाही हे सदस्य विचारपूर्वक करतील. या पदासाठी सौरव गांगुली भारताचे प्रतिनिधीत्व करणार होते; पण आयसीसीच्या अध्यक्षपदाबाबतचा कोणताही निर्णय अद्याप बीसीसीआयला घेता आलेला नाही. गांगुली यांना आयसीसीवर पाठवण्याचा निर्णय त्यांच्यासाठी खुला असेल; पण तसे घडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.