पंढरपूर (प्रतिनिधी) “

पंढरपूर- मिरज या महामार्गावर वाहने आडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसापूर्वीच एक लुटीचा प्रकार घडला होता.

पंढरपूर-मिरज या राष्ट्रीय मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या महामार्गावर रात्रीच्या वेळेस धावती वाहने आडवून ती लुटली जातात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसापूर्वीच कुची गावाजवळ चारचाकी वाहन आडवून त्यांना चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व दागिने असे जवळपास २ लाख रुपयांचा ऐवज लुटला होता.

त्यामुळे या मार्गावर रात्रीची वाहतूक करणे प्रवाशी टाळत आहे. रस्ता रुंदीकरणामुळे सर्वच रस्ते मोठे झाले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या वस्त्या कमी झाल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवसाहत नाही. त्यामुळे मध्यरात्रीनंतर रस्त्यावर वाहतूक कमी झाल्यावर चोरीचा धोका वाढतो. रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू शकतात.

माधवी जनार्धन जानकार, भाग्यश्री पाटील व त्यांचासोबत अन्य काहीजण (सर्व. रा. कोल्हापूर) हे ३० डिसेंबर रोजी पंढरपूरकडे येत होते. भाग्यश्री पाटील या गाडी चालवत होत्या. मिरजवरून पंढरपूरकडे येत असताना कुची गावाच्या आसपास आल्यावर एका ढाब्याजवळ त्यांच्या गाडीवर दगड मारण्यात आला. त्यावेळी भाग्यश्री पाटील यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. त्याचवेळी ४ ते ५ चोरटे गाडीजवळ आले. त्यातील दोघांनी चाकूचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. एकाने रोख रक्कम, मोबाईल आणि चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ९१ हजार रुपयांचा माल चोरांनी लंपास केला. यावेळी गाडीतील दोघांनी चोरांशी झटपट केली होती पण ते जखमी झाले होते.

दरम्यान महामार्गावर झालेल्या या घटनेतील आरोपीना अटक करणे हे पोलिसांना आव्हानच होते. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या चोरीचा तपास करून आरोपीस अटक केली आहे. मिरज तालुक्यातील लिंगनूर येथील जलवा उर्फ त्रिदेव सिसफूल भोसले याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चार आरोपी पळून गेले आहेत. सदर चोरीचा तपास स्थानिक गुन्हे विभागाकडे होता. त्यामुळे या पथकाने तपास करून त्यानुसार त्यांनी लिंगनूर येथे छापा घालून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या तेर इतर साथीदार मात्र फरार झाले आहेत. सदर आरोपीकडून चोरीतला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणातील पाचही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. यातील जलवा भोसले याच्याविरुद्ध सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि पुणे जिल्ह्यातील रांजणगाव पोलिसठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर फरार आरोपीवर देखील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या चोरीचा तपास लागल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते आहे.