कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छ. शाहू महाराजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथे २६ जून रोजी सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यात आले. या उपकेंद्राचा मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन योजना राबविण्यासंदर्भात आज (गुरुवार) जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सारथीची आढावा बैठक संपन्न झाली.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर,  सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, निबंधक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.

अशोक काकडे म्हणाले की, सारथी संस्थेला ठरवून दिलेल्या उद्धिष्ठांनुसार येथील मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासाकरीता सूक्ष्म नियेाजन करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने ज्या संस्था, घटकांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत त्याचे अवलोकन करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण हितासाठी त्या अंमलात आणल्या जातील. तसेच सारथी (पुणे) संस्था सुरु झाल्यापासून पहिल्या वर्षी एमफीलच्या ५०२ विद्यार्थ्यांना सारथीच्यावतीने फेलोशिप देण्यात आली असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

या बैठकीत शिवाजी विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्यासह सारथी संस्थेच्या अनुषंगाने संलग्न असलेल्या इतर संस्थांचाही आढावा घेण्यात आला.

या बैठकीसाठी इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा कौशल्य विकासचे सहायक संचालक संजय माळी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.