कोल्हापूर (प्रतिनिधी) : नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी सर्व रुग्णालयातील तीस टक्के बेड राखीव ठेवावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाबाधितांची आकडे रोज वाढत होते, या काळात सर्व रुग्णालयामध्ये फक्त कोरोना पॉझीटव्ह रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जात होते, तर दुसरीकडे कोरोना नसलेल्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करतानाच कोरोना नसलेल्या (नॉन कोबीड) रुग्णांकडे मात्र खाजगीसह शासकीय रुग्णालयाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असलेले चित्र पहायला मिळत आहे. आपघात, प्रसुती, किडनीचा आजार, मधुमेह, हृदयविकार, मणक्याचे आजार, मेंदुचे आजार व पक्षाघात हे सर्व आजार तातडीचे आणि नॉन कोवीड आजार आहेत. त्याना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार नाकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही रुग्णांना कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आलेले असताना देखील रुग्णालयाने त्यांना दाखल करुन घेतले नाही.
यामुळे त्यांना उपचारासाठी अनेक रुग्णालयाकडे भटकंती करावी लागत आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांचे जीवही धोक्यात आले आहेत, तसेच काही रुग्णांना उपचार वेळेत न मिळाल्याने मृत्यु हि झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. यामुळे सर्वच रुग्णालयात नॉन कोवीड रूग्णांवरील उपचारासाठी ३० टक्के बेड राखीव ठेवण्यात यावेत. यामुळे नॉन कोविड रुग्णांवर उपचार होतील. नॉन कोविड रुग्णांवरील उपचारांसाठी बेड राखीव ठेवले आहेत, हे तपासण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात यावी.