कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. तरीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सेनापतीनेच बंड केले आहे. मंत्री मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भय्या माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माने हे मुश्रीफ यांचे निकटचे कार्यकर्ते आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातून लाड यांच्यासह नीता ढमाले, उमेश पाटील, भय्या माने इच्छुक होते. पण पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचे निकटचे कार्यकर्ते भय्या माने यांनी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीमध्येही बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.