कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड-१९ या आजाराचे कमी खर्चात व जलद निदान करणे आता शक्य होणार आहे. ‘पीएच रिस्पॉन्सिव्ह मॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स’चा वापर करून कोविडचे जलद निदान करण्याची पद्धत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लेनरी स्टडीजच्या डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, रिसर्च स्टुडंट ऋतुजा गंभीर व त्यांच्या टीमने विकसित केली आहे. हे संशोधन ‘स्प्रिंगर नेचर’ च्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे.

कोविडचे निदान करण्यासाठी सध्या आरटी-पीसीआर पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये व्यावसायिक वापराचे आरएनए किट व तंत्रज्ञान वापरून निदान केले जाते; मात्र ही पद्धत वेळखाऊ असल्याने स्वाब घेतल्यानंतर कोविडचे निदान होण्यासाठी काही तासांचा कालावधी लागतो. प्रशिक्षित कर्मचाऱ्याची गरज, रासायनिक घटक, किटची किमत आदीमुळे ही प्रक्रिया अधिक खर्चिकही आहे.

डॉ. अर्पिता पांडे-तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यानी संशोधित केलेल्या नव्या निदान पद्धतीमध्ये महागड्या आरएनए किटची आवश्यकता भासणार नाही. या पद्धतीमध्ये ‘पीएच रीस्पोन्सिव्ह ग्लेसीन फक्शनलाइज्ड मॅग्नेटिक आयर्न नॅनो पार्टिकल्सचा’ वापर करण्यात आला आहे. मॅग्नेटीक नॅनो पार्टिकल्सची ही प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या अतिशय स्वस्त, अत्यत प्रभावी आणि पर्यावरण पूरकही ठरणार असल्याचे या संशोधन पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. हे किट व्यावसायिक वापरासाठी अद्याप प्रमाणित करण्यात आलेले नाही, मात्र लवकरच त्याला मान्यता मिळू शकते.

कोविडचे कमी खर्चात जलद निदान करणाऱ्या पद्धतीचे संशोधन केल्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, विभागप्रमुख डॉ. एस. मोहन करुपाईल यांनी अभिनंदन केले आहे.