सांगली/प्रतिनिधी : राज्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत दोन महिन्यात राणे तिहार जेलमध्ये दिसतील, असं जोरदार प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिलं आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असा दावा केला होता. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन महिन्यात आमची सत्ता येणार आहे. तेव्हा नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. असे असले तरी खासदार संजय राऊत हे आजपासून पुढील तीन दिवस सांगली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सांगलीत पोहचल्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळतं आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे आम्ही त्याचं काम करू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

..तर दोन महिन्यांनी राणे तुरुंगात
नारायण राणेंनी वक्तव्य केलं आहे की उद्धव ठाकरेंना अटक होणार त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते कुठे असतील तिहार जेलमध्ये.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच नवनीत राणांबाबत मी काहीही बोलणार नाही. काही लोकांविषयी मत न व्यक्त करणंच योग्य असतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.