मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. मोफत लसीकरण करण्यासाठी डोस विकत घ्यावे लागणार असून त्यासाठी राज्य सरकारला सुमारे साडेसहा हजार कोटी खर्च येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) दुपारी दिली. मात्र, केवळ सरकारी रुग्णालयातच ही लस मोफत मिळणार असून खाजगी रुग्णालयात लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

टोपे यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील साधारणपणे ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या असून त्यांना प्रत्येकी दोन या हिशोबाने राज्याला साधारण १२ कोटी डोसची आवश्यकता असेल. महिन्याला २ कोटी डोस द्यावे लागतील. १३ हजार संस्था आरोग्य विभागाच्या आहेत. त्यामुळे राज्यात रोज १३ लाख लसीकरण करता येऊ शकेल.

राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. लसींच्या खरेदीसाठी राज्य सरकार तयार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. आजपासूनच या लसीकरणाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.