मुंबई – महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे. तापमानात वाढ या आठवड्यातही कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या उन्हाचा फक्त लोकांना त्रास होत नाहीय तर मुक्या प्राण्यासुद्धा याची झळ सहन करावी लागत आहे .या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट करून पक्ष्यांना पाणी ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच उन्हाचा त्रास वाढल्याने मुलांच्या शाळांना सुट्ट्या देण्याचं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला हे आवाहन केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे..?

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा.असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केली आहे.