मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही देशांमधील सामना होणार आहे. अशा स्थितीत हवामान खात्याच्या अहवालानुसार २१ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियन महानगरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची ६५ टक्के शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांच्या पदरी निराशा येऊ शकते.

रविवारी मेलबर्नमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. पावसाची शक्यता पाहता चाहत्यांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर सामना पाहण्यासाठी सज्ज असलेल्या सुमारे एक लाख लोकांची निराशा होऊ शकते.

मेलबर्नमध्ये ढगाळ वातावरणामुळे पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव दिसून येईल. ऑस्ट्रेलियाच्या तीन राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल, पण क्रिकेट चाहत्यांना या दोन्ही संघांमधील शानदार सामना पाहायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारत त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने उतरेल.