कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जमावबंदी, संचारबंदीचा आदेश डावलून आणि प्रतिबंधक आदेशाचा भंग करून गांधीनगर मेनरोडवरील उचगांव हद्दीतील हॉटेल चालू ठेवल्याबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज (गुरुवार) छापा टाकून दोन हॉटेलमालकासह ३४ ग्राहक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अकरा दुचाकी जप्त करण्यात आल्या. धीरज लखमीचंद केसवाणी (वय २३, रा साईबाबा मंदिर जवळ, गांधीनगर) आणि पंकज संजय वासवानी (वय २३, रा. पाच बंगला परिसर, गांधीनगर) अशी हॉटेल मालकांची नावे असून डायट डिलाइट कॅफे आणि रेस्टो असे हॉटेलचे नावे आहेत.

गांधीनगर मेनरोडवर उचगाव हद्दीमध्ये खुटाळे कॉम्प्लेक्स लगत हे हॉटेल ओंकार बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. हे बहुचर्चित हॉटेल रात्री-अपरात्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांना याबाबत कळवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा छापा आज पहाटे टाकण्यात आला.

हॉटेल डायट डिलाईटमध्ये पोलिसांचे पथक गेले असता तिथे मोठ्या प्रमाणात ग्राहक होते. त्यांना नऊ कामगारांच्या वतीने सेवा पुरवली जात असल्याचे निदर्शनास आले. ग्राहक अथवा कर्मचाऱ्यांनी कोणीही मास्क लावला नव्हता, सोशल डिस्टन्स ठेवला नव्हता. त्यामुळे या सर्वांकडून जमावबंदी व संचारबंदीचा भंग झाल्याने तसेच कोरोना महामारीचे प्रतिबंधक आदेश धुडकावल्याने दोन हॉटेल मालक, नऊ कर्मचारी आणि २३ ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद हवालदार चेतन बोंगाळे यांनी दिली आहे.