कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे ओढवलेल्या जागतिक महामारीच्या संकटाशी  आज प्रत्येकजण लढत आहे. आरोग्याविषयी काळजी घेत आर्थिक घडी रूळावर आणण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. मात्र, या सर्व घटकांशी लढत जीवनाचे काही दिवस आनंदात जगू पाहणाऱ्या आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील अनाथांपासून ते वयोवृद्ध आजी – आजोबांना मदतीची अपेक्षा आहे.  दानशूरांनी वृद्धाश्रमाला साहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१९९५ साली कै. रुक्मिणी पांडुरंग पाटोळे व मा. शिवाजी पांडुरंग पाटोळे कुटुंबीयांनी सुरु केलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात मागील २५ वर्षे अविरत सेवा सुरु आहे. कोणत्याही शासकीय मदतीविना शिवाजी पाटोळे व घरातील १२ जण ही सेवा बजावत आहेत. सध्या  मातोश्री वृद्धाश्रमात  ५० नागरिक आहेत. सध्या  कोरोना महामारीमुळे दानशूरांची संख्या कमी झाली असून वृद्धाश्रम अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या वृद्धाश्रमास देणगी म्हणून आर्थिक, वस्तू  धान्य, बांधकाम , भाजीपाला व अन्य  स्वरूपात देखील आपण मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वृद्धाश्रमात श्रमदान करू इच्छिणाऱ्यांनाही संधी देण्यात येणार आहे. या वृद्धाश्रमात वाढदिवस व स्मृतिदिन असे कार्यक्रम साजरे करून अन्नदानासारख्या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी अॅड. शरद पाटोळे यांच्याशी ९५७७३५७७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.