कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील वीज बीलं माफ करावीत या प्रमुख मागणीसाठी आज (शुक्रवार) भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. या वेळी ‘लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ झालीच पाहिजे, महावितरणचं करायचं काय – खाली डोकं वर पाय, चालढकल करणाऱ्या महावितरणचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
राज्यात कोरोनामुळं २० मार्चनंतर तीन-चार महिने लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योगधंदे बंद झाल्याने नागरिक बेरोजगार झालेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. त्यातच महावितरणने वीज दरवाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलं माफ करावीत या मागणीसाठी राज्यभर आंदोलनं होत आहेत. आज कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात शहर चिटणीस बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, संभाजीराव जगदाळे, संभाजीराव माने, मोहन पाटील, अॅड. उज्ज्वला कदम, शाहीर रंगराव पाटील, सुभाष सावंत, महेश चव्हाण यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.