मुंबई (प्रतिनिधी) : यंदाही कोरोनाच्या सावटाखाली राज्यात शुक्रवारपासून (दि.१०) गणेशोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यास मनाई केली आहे. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना : –

१. गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

२. महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणानुसार मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

३. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी.

४. पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन घरच्या घरी करावे. किंवा  नजीकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी करावे.

५. उत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची दक्षता घ्यावी.    आरोग्य विषयक व सामाजिक जाहिरात प्रदर्शित कराव्यात.

६. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे, कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करावी.