नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (मंगळवार) संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाबाबत आढावा घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. तसेच कोरोना लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती देऊन राज्यांनी लसीकरणाचा आरखडा तयार करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केले.

मोदी म्हणाले की, कोरोनाविरोधातील लढाई अजून थांबलेली नाही. कोरोना लसीचे काम वेगात सुरु आहे. कोरोना लसीची किंमत काय असेल ? कशी असेल ? किती डोस असतील हे अद्याप निश्चित केलेले नाही. लस साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज आहे. लस देण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल.

भारतात तयार होणारी लस अधिक सुरक्षित असल्याचा विश्वास व्यक्त करून लसीचे वितरण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल. दीर्घकाळ चालणाऱ्या लसीकरणासाठी योग्य नियोजन करण्यासाठी राज्यपातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्याच्या सूचना मोदींनी यावेळी दिल्या.