मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तसेच मुंबै बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर हे ‘मजूर’ आहेत किंवा नाही, याची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सहकार आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवली असून तुम्हाला अपात्र का घोषित करु नये? अशी विचारणा केली आहे.

नोटीसमध्ये प्रवीण दरेकर हे त्यासाठी अपात्र असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख केला. यामध्ये दरेकरांच्या उत्पन्नाचा आकडा दिला असून यावरुन प्रथदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसून येत नाही, असे म्हटले आहे.

मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती असून जिचे उपजिविकेचे प्रमुख साधन मजुरीवर अवलंबून असेल. तसेच तो शारिरीक श्रमातून मजूरी करणारा असला पाहिजे, अशी तरतूद असून आपण महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन ‘स्वतंत्र व्यवसाय’ असे नमूद केले आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच यासंबंधी कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.