गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पाऊस पडत असताना आडोश्याला थांबलेल्या तिघांवर पोल्ट्रीची भिंत कोसळली आणि तिघांचाही त्याखाली दबून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असून तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. आज (गुरुवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास नूल मार्गावरील माने वसाहतीमध्ये ही मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अजित अर्जुन कांबळे (वय ४८),  संगीता बसाप्पा कांबळे (वय ४५) आणि गिरीजा संदीप कांबळे (वय ४५ तिघेही रा. नांगणूर, ता. गडहिंग्लज) अशी मृतांची नावे आहेत.

अधिक माहितीनुसार, अजित हा त्याच्या भावाची बायको संगीता आणि बहीण गिरीजा यांच्यासह दुचाकीवरून नांगणूरकडे निघाला होता. मुगळीतुन बाहेर पडताच माने वसाहतीजवळ सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी त्यांनी रस्त्याकडेला दुचाकी लावून भीमा माने यांच्या पोल्ट्री शेडच्या बाजूला आसरा घेतला. पण कांही क्षणांतच पूर्ण भिंत त्यांच्यावर कोसळली आणि तिघेही त्याखाली दबले गेले. त्यातच तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतरही मुसळधार पाऊस बराच वेळ सुरूच राहिला त्यामुळे त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालुन लवकर काढता येत नव्हते. एकाच कुटुंबातील तिघांवर अशा पद्धतीने काळाने घाला घातल्याचे चित्र पाहताना बघ्यांच्या काळजाचा थरकाप होत होता. घटनास्थळी गडहिंग्लज पोलिसांचे पथक दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.