पन्हाळा (प्रतिनिधी) : इतिहासाचा साक्षीदार आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळगड परिचीत आहे. थंडगार वारा, निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक इमारती आणि येथील प्रसिद्ध असलेली झुणका भाकर यामुळे पन्हाळगडावर पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, कोरोना आणी नैसर्गिक आपत्तीमुळे सलग दिड वर्षे बंद असलेला पन्हाळा आता शुक्रवार,  शनीवार आणि रविवार या सलग शासकीय सुट्टीमुळे पर्यटक पन्हाळ्यात येवू लागले आहेत. त्यामुळे पन्हाळगड पर्यटकांनी पुन्हा एकदा हाऊसफुल्ल झाला आहे.

सध्या सलग सुट्टीमुळे पन्हाळा बऱ्यापैकी हाऊसफुल्ल असला तरी येथील तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार हा परीसर पुरातत्व विभागाने अजुनही बंदच ठेवला आहे. पण पुसाटीबुरुज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवणी परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे.पर्यटकांच्या गर्दीमुळे लहानमोठे व्यवसाय तेजीत सुरु आहेत. या ठिकाणी खाण्याच्या पदार्थांची पार्सल सेवा सुरु आहे. तर हाँटेल्स आणि लाँजिंग यांना अजुन अपेक्षित प्रतीसाद नसल्याचेही अनेक हाँटेल मालकांनी सांगितले.

पर्यटकांच्या गर्दीमुळे पन्हाळा नगरपरिषदेच्या प्रवासीकर आणि वाहनकरात वाढ होताना दिसत आहे. भाजलेले आणि उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका-भाकर या खाद्य पदार्थावर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. या तीन दिवसात गडावर पुन्हा एकदा बऱ्यापैकी पर्यटक हजेरी लावतील असा अंदाज आहे.

दरम्यान, पन्हाळा येथे प्रवासीकर नाक्यावर पर्यटकांची पोलीसांकडून तपासणी सुरु असुन लायसेन्स, मास्क नसल्यास दंड आकारुन त्यांना परत पाठवले जात असल्याने पर्यटक आत येण्यास घाबरत आहेत.  पन्हाळा येथील अंधारबाव परिसराचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे या परिसरात पर्यटकांच्या मनोरंजानांसाठी फनफेअर सारखी खेळणी आणि लहान गाड्या सुरु झाल्या आहेत. पन्हाळा पूर्वपदावर येवू लागल्याने गडावर चैतन्य निर्माण झाले आहे.