पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पल्लवी नायकवडी यांची आज (गुरुवार) बिनविरोध निवड करण्यात आली. नगपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले.

पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आदी महत्त्वाची पदे जनसुराज्य पक्षाकडे आहेत. शरयु लाड यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज पल्लवी नायकवडी यांनी उपनगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज सादर केला होता. पल्लवी नायकवडी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी पल्लवी नायकवडी यांची अधिकृत घोषणा धडेल यांनी केली.

यावेळी आजी-माजी नगरसेवक, जनसुराज्यशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करण्यात आली. उपनगराध्यक्ष पल्लवी नायकवडी यांनी यावेळी पन्हाळा स्मशानभुमीला पाचहजार शेणी दान म्हणून देत वृक्षारोपणही केले.