सिडनी (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला. या सामन्यात न्यूझीलंड प्रथम खेळताना न्यूझीलंड संघान १५३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १९.१ षटकांत ३ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

सिडनी येथील सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने २० षटकांत ४ बाद १५२ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी १५३ धावाचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. आफ्रिदीने पहिला चेंडू अॅलेनला टाकला आणि पहिल्याच चेंडूवर अॅलेनने शानदार चौकार मारला. यानंतर एक वेगळाच ड्रामा झाला. आफ्रिदीने दुसरा चेंडू टाकला आणि दुसऱ्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीने पायचितचे अपील केले, पण न्यूझीलंडने लगेच रिव्हयू घेतला आणि हा रिव्यू न्यूझीलंडच्या बाजूने गेला आणि अॅलेनला नाबाद दिले. शाहीन डगमगला नाही त्याने अॅलेनला आऊट करायचे मनात ठाम केले होते आणि तिसरा चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवर अॅलेन वाचला पण तिसऱ्या चेंडूवर अखेरीस आफ्रिदीने अॅलेनला पायचित बाद केले. तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या १ बाद ४ धावा अशी होती. त्यानंतर पाकिस्तानने सामन्यावर नियंत्रण ठेवले आणि या गोष्टीचाच फायदा त्यांना यावेळी झाला.

पाकिस्तानने तब्बल १३ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानी संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. २००९ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात त्याने शेवटच्या वेळी अंतिम फेरी गाठली होती आणि विजेतेपदही पटकावले होते.

सलामीवीर बाबर (५३ धावा) आणि रिझवान (५७ धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी १०५ धावांची सलामी भागीदारी केली. संपूर्ण स्पर्धेत या दोघांच्या सलामीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ २४ धावा देत २ बळी घेतले. पहिल्याच षटकात झालेली चूक न्यूझीलंडला भारी पडली. जेव्हा बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेव्हॉन कॉनवेने बाबरचा झेल सोडला. तेव्हा बाबर आझमचे खातेही उघडले नव्हते.