कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने आज (शनिवार) सकाळी ९ च्या दरम्यान एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे (वय ४१, रा. गिरगाव, ता. करवीर) असे मृताचे नांव आहे.

त्यांच्यावर कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एकीकडे प्रशासनाकडून ऑक्सिजन कमी पडू देणार नसल्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे मात्र, ऑक्सिजन अभावी या तरूणाला जीवाला मुकावे लागले आहे. कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रयत्नशील असताना प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असल्याचे समोर आले आहे.