पुणे :लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या राज्यात वाहू लागल आहे.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावत आहेत. यातच शरद पवार यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ  समर्थ पोलिस ठाण्याच्या परिसरात प्रचार सभा घेतली. यावेळी सत्ता ही लोकांचे कल्याण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असते. भाजप सरकारने दहा वर्षांत जनतेला फसवण्याचे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले. सत्तेचा उन्माद काय असतो, हे राज्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यानिमित्ताने समर्थ पोलिस ठाण्याच्या परिसरात आयोजित प्रचार सभेत शरद पवार बोलत होते. जयंत पाटील यांनी महिलांचा द्रौपदी म्हणून केलेल्या उल्लेखाचा आधार घेत अलीकडे काहीजणांचा तोल जायला लागला, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला

यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे गजेंद्रसिंहराजे होळकर उपस्थित होते.