मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी गोकुळ दूध संघावर शासन नियुक्त संचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तर मुरलीधर जाधव हा एक सच्चा निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळेच आमचा मुरलीधर गोकुळात गेला असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गोकुळ दूध संघ हा सहकार क्षेत्रातील मानबिंदू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकरण व समाजकारण हे सहकार क्षेत्राविना तोकडे आहे. त्यामुळे अग्रगण्य असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती होणे, ही बाब शिवसेना आणि शिवसैनिक बंधू-भगिनींसाठी एक चैतन्यमय आहे. त्यामुळे आमचा मुरलीधर गोकुळात गेला याचा सार्थ अभिमान असल्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान,मधुकर पाटील,नामदेव गिरी, अर्जुन जाधव उपस्थित होते.