कळे ( प्रतिनिधी ) : सावर्डे तर्फ असंडोली, ता.पन्हाळा येथील मारूती पाटील, प्रमोद पाटील, सुरेखा पाटील ह्या शेतकरी दांपत्याने आपल्या देशी गायीचे सातव्या महिन्यात अगदी थाटा-माटात ओटी भरणी करून मूक जनावरा प्रती एक वेगळी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना पहिल्यापासून गाय या प्राण्याविषयी प्रेम, माया, जिव्हाळा आहे.

हिंदू धर्मात गायीला देवता मानून तिची पूजा-अर्चा केली जाते. शेतकरी गायीला गो-माता नावाने संबोधतो. विशेषतः देशी गायीचे शेतकऱ्यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. देशी गायीच्या दुग्धजन्य पदार्था बरोबरच गोमुत्र व गोवऱ्यांनाही होम-हवन साठी मागणी असते.

पाटील कुटूंबियातील सौ.सुरेखा पाटील यांनी ओटी भरणी समारंभाचे नियोजन केले होते. गोड-धोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून गायीला साडी-चोळीचा आहेर करण्यात आला. गल्लीतील महिलांना गायीच्या ओटी भरणीचे आमंत्रण देण्यात आले होते. गल्लीतील महिलांनीही गायीची ओटी भरणी करून तिचे औक्षण केले. उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देऊन त्यांचा यथोचित पाहुणचार करण्यात आला.गायीची ओटी भरणी केल्यानंतर गायीला सुग्रास, मिनरल मिक्चर, कडबा कुट्टी, कपरी पेंड, गहू, भुस्सा असा पौष्टिक आहार देऊन तिचे डोहाळे पुरविण्यात आले.

गो हत्या थांबली पाहीजे, देशी गाय टिकली पाहीजे.

गो हत्या थांबली पाहीजे, देशी गाय टिकली पाहीजे, देशी गायींचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. देशी गाय टिकली पाहीजे. शेतकऱ्यांनी एक तरी देशी गाय पाळली पाहीजे. देशी गायीचे मलमुत्र, शेण, दूध, दही, तुप औषधी गुणकारी आहे. असे या दांपत्यांचे मत आहे.