कोल्हापूर (प्रतिनिधी) : एसईबीसी मधून निवड झालेल्या महावितरण बरोबर अन्य विभागातील उमेदवारांना त्वरित नियुक्ती मिळावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार. अशी भूमिका अखिल भारतीय महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते वसंतराव मुळीक यांनी घेतली आहे.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर एसईबीसी अंतर्गत नोकरीत स्थगितीपूर्व निवड झालेल्या उमेदवारांना न्याय मिळावा. यासाठी महावितरणमध्ये सरळसेवा कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेतून निवड झालेल्या पण नियुक्ती न झालेल्या उमेदवारांची बैठक मंगळवार पेठ येथे सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मुळीक म्हणाले की, महावितरणमध्ये ३२७ उमेदवारांनाच्या नियुक्त्या झालेल्या उमेदवारांची कागद पडताळणी ४ फेब्रुवारी २०२० रोजी पूर्ण झाली. पण त्यानंतर ४५ दिवसात नियुक्ती मिळणे आवश्यक होते. परंतु नऊ महिने झाले तरी त्यांची नियुक्ती देलेली नाही. तरी या सर्व उमेदवारांना त्वरित नियुक्त्या द्याव्यात असे मुळीक म्हणाले. महावितरण बरोबर, आरोग्य, महावितरण तंत्र ३, महा मुंबई मेट्रो नॉन, विक्रीकर निरीक्षक, राज्य सेवा, कर सहायक, एमपीएससी लिपिक, सहायक विभाग अधिकारी, तलाठी, एमएससी बोर्ड लिपिक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, एमईएस स्थापत्य अभियांत्रिकी, महावितरण उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहायक भरती २०१९ या जवळपास १४ ठिकाणातील हजारो उमेदवारांच्या सर्व नियुक्त्या करण्यात याव्यात असे आवाहन केले.

दरम्यान, उद्या (शनिवार) पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी मराठा समाजातील प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या बैठकीला इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, अवधूत पाटील, प्रा. अरविंद पाटील, अभिजित तोरस्कर, अक्षय पोळ, अनिरुद्ध गुरव, अक्षय तोडकर, सागर मगदूम, आकाश बिडकर, योगेश साळोखे, संग्रामसिंह घोरपडे आदी उपस्थित होते.