वारणानगर ( प्रतिनिधी ) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांच्यामधील नाविन्यपूर्ण कल्पकतेला चालना मिळावी व विज्ञान विषयक अविष्कार सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालय गेली 37 वर्षे “युरेका -जिज्ञासा’ नावाची राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प प्रदर्शन व शोध निबंध स्पर्धा आयोजित करत असते.

महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक, विभागप्रमुख यांच्या व्यवस्थापनाखाली शैक्षणिक वर्ष 2023 – 24 मध्ये शनिवार, दि.20 एप्रिल 2024 रोजी युरेका -जिज्ञासा 2 के 24 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी युरेका जिज्ञासा स्पर्धेचे उद्घाटन कॅपजेमिनी इन्फॉर्मेशन सायन्स कंपनीचे उपाध्यक्ष बाला थयागराजन यांच्या हस्ते होणार आहे.

ह्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याना दोन लाखाहून अधिक रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. गतवर्षी ह्या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून व जवळच्या राज्यातील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवरील असून विद्यार्थ्यांच्या संशोधन व चिकित्सक वृत्ती, संवादक्षमता, सर्जनशीलता या गुणांना प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्यामधील विविध कौशल्ये वृंधिगत करणेसाठी लाभदायक ठरते. यातून अभियंत्याना आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची जाणीव होते व अत्यावश्यक परिवर्तनाची माहिती प्राप्त होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल करिअरसाठी आणि भविष्यासाठी वाटचाल करता येते अशी माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांनी दिली.

ही स्पर्धा एकूण सहा विभागात घेतली जाणार आहे. त्यामध्ये रासायनिक, यांत्रिक, स्थापत्य, विद्युत परमाणु , संगणक तंत्रज्ञान तसेच प्रथम वर्ष असे विभाग आहेत. प्रथम वर्ष विभागासाठी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. कमी वयातच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती आणि संवादक्षमता वाढीस वाव देणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेला प्रथम क्रमांक-3000, द्वितीय क्रमांक-2000, व तृतीय क्रमांक-1000, अशी रोख पारितोषिकासह ,2 लाखांची इतर बक्षिसे आहेत. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला राष्ट्रीय पातळीचे प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. “अपर्णा पुरस्कार” हा प्रत्येक वर्षी जिज्ञासा स्पर्धेच्या सर्व विभागातून असणाऱ्या बेस्ट प्रोजेक्ट साठी 5000 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल.


प्राचार्य, डॉ. एस. व्ही. आणेकर, डॉ. एस. एम. पिसे, डीन, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, अधिष्ठाता, विद्यार्थी विकास,डॉ. एन. एस. धाराशिवकर, संयोजक प्रा.आर.बी.पाटील व सह- संयोजक,प्रा. व्ही. एम. सनदे , प्रा. एस. एच. मोरे यांनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांना युरेका -जिज्ञासा या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी म्हणजे एक पर्वणीच असल्याचे नमूद केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विदयार्थी समन्वयक सुमय मगदूम, विघ्नेश गुरव, विराज पवार, अस्मिता जाधव, प्रणिता पाटील, सौरभ सावंत, सुरेश शेळके, प्रथमेश पाटील व विदयार्थी प्रतिनिधी अथक परिश्रम घेत आहेत.

10 नामवंत कंपन्या ह्या युरेका -जिज्ञासा 2के24 च्या प्रमुख प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही.व्ही. कारजिन्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पत्रकार परिषदेस प्रा. गणेश कांबळे आणि जालीधर जाधव उपस्थित होते. माहितीसाठी व स्पर्धेमध्ये प्रवेशासाठी संपर्क: संयोजक व संगणक विभाग प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, मो. ९९७५४१९४८३ वेबसाईट : www.tkietwarana.ac.in