साळवण (प्रतिनिधी)  :  गगनबावडा तालुक्यातील केशरी कार्डधारकांना धान्य मिळावे म्हणून गगनबावडा तहसिलदार संगमेश कोडे यांना २५ जून रोजी मराठा समाज संघटनेतर्फे निवेदन देऊन ९ जू्लै रोजी साळवण रस्त्यावर चक्काजाम करण्याचा इशारा दिला होता. यावेळी तहसिलदारांनी तातडीने कोल्हापूर जिल्हा पुरवठा विभागाला ही बाब कळवली. जिल्हा पुरवठा विभागाने याची गांभीर्याने दखल घेत मराठा समाज संघटनेच्या मागण्या मान्य केल्या.

संगमेश कोडे म्हणाले की, ९ जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालया बरोबर पत्रव्यवहार होवून आपल्या तालुक्याला २४00 कार्डधारकांना लाभ प्राप्त झालेला आहे. आता जे मंजूर पात्र लाभार्थी आहेत त्यांचे नाव डाटायंट्री मार्फत नोंद करण्याचे काम सुरु आहे. तरी ९ जुलै रोजी जे आंदोलन मराठा समाज साळवण येथे करणार होते ते आंदोलन स्थगित व्हावे, असे तहसिलदारांनी आंदोलकांना आवाहन केले.

यावेळी संदिप पाटील, शिवाजी राऊत, सचिन जाधव, इंद्रजित मेंगाने, रणजित पाटील उपस्थित होते.