जोतिबा (प्रतिनिधी) :  सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन ची ‘दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. या मालिकेची कथा श्री जोतिबाच्या कथेला अनुसरून नाही, श्री जोतिबाचा मूळ ग्रंथ ‘केदार विजय’ या ग्रंथाचा आधार मालिकेचे लेखक डॉ. ठोंबरे यांनी घेतलेला नाही, असा दावा येथील पुजारी वर्गाने तसेच अभ्यासू भक्तगण यांनी केला आहे.

ही मालिका केदार विजय या ग्रंथाला अनुसरून असावी, अशी मागणी अभ्यासू भक्तगण आणि पुजारी आणि ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे. येथील पुजारी आणि महाराष्ट्र तसेच कर्नाटक येथील भक्तगण यांच्यामध्ये जोतिबाची केदार विजयाप्रमाणे माहितीचा संवाद वर्षनुवर्षे चालू आहे. या मालिकेमधील माहितीमुळे भक्तगणांमध्ये संभ्रम आणि विरोधाभास निर्माण झाला आहे.

केदार विजय ग्रंथातील माहिती खालील प्रमाणे तपशीलवार दिली आहे, ती अशी ही माहिती विश्वशक्ती मित्र मंडळ यातील अभ्यासकांनी दिलेली आहे. कोणाला या संदर्भात काही शंका असतील, तर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

१) केदारनाथ प्रकट होण्यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या होत्या. ज्यामुळे केदारनाथांच्या अवताराची चाहूल सर्व जगताला लागली होती. ज्याप्रमाणे विद्याद्रिने आपली उंची वाढवली आणि दक्षिणेकडे अंधकार झाला आणि सुरु झाले अत्याचार अनाचाराचे थैमान.

२) या अत्याचारामध्ये करवीर या दैत्यांने योगदंडाची प्राप्ती केली.

३) योगदंडाच्या नुसत्या वाऱ्याने सुध्दा लोक शेळ्या मेंढ्या होत होते. या लोकांना वाचवण्यासाठी आई अंबाबाई आपल्या मानसपुत्राला गादीवर बसवून हिमालयी पूर्णब्रम्ह सनातन अशा जोतिस्वरुप ईश्वराला विनंवण्या करण्यासाठी हिमालयी गेली पण लेखकाला या हिमालयी क्षेत्राचा जणू विसरच पडला आहे.

४) लेखकाला मैनाकगिरी म्हणजे काय विषय आहे, तो माहीत नसावा.

५) आणि हो, लेखकाने नुसत्या आमच्या देवांच्या आरतीचा जरी अभ्यास केला असता तर त्यांना कळले असते की, आमचा देव कुठे प्रकट झाला. ‘उत्तरेचा देव दक्षिणी आला’.

६) वेशभूषेबद्दल तर न बोललेले बरे, अरे आमच्या देवांची वेशभूषा कशी जठाधारी, रुद्राक्षधारी आणि पितांबर नेसलेले पादुकाधारण केलेले असे वैरागी रुप. पण लेखकाने तर फेटा, कवड्याची माळ आणि कोल्हापुरी चमड्याचे चप्पल हा तर न समजलेला आणि न पचणारा भाग आहे.

७) देवाची भाषा कशी पाहिजे तर सात्विक. ना की गावटी. ज्याप्रमाणे रामायणात प्रभु श्रीराम आणि महाभारतात श्रीकृष्ण यांची भाषा आहे. अगदी त्याप्रमाणे.

८) ‘शेषारुढंम’ या शब्दांचा अर्थ जर लेखकाला कळला असता, तर काल्पनिक पात्र सार्पासुर हा दैत्य दाखवलाच नसता आणि युध्दतर लांबचीच गोष्ट.

९) देव घोड्यावर प्रकट झाला, हे पहिल्यादांच कळले, लेखकाला माहितच नसेल की, हा घोडा कोण होता आणि तो देवाला कुणी व कधी अर्पण केला.

१०) पौगंडरुषी आणि विमलाभुंजा या व्यक्तीरेखा लेखकाला समजलेल्या दिसत नाहीत.

११) येमाई ही मुळगिरीवर औंधासुरचा वध करण्यासाठी देवाच्या डमरुनादावरुन व ये…माई ये अशी साद घातल्यानंतर  प्रकट झाली. यांच्याशी लेखकांचा संबंध दिसून येत नाही.

१२) आणि चोपडाईबद्दल न बोललेलंच बर, चंबळच्या खोऱ्याबद्दल लेखकाला काही माहीत असेल, असे वाटत नाही. आदिमायेच्या स्वरुपाबद्दल लेखकाला काहीच माहीत नाही. ही लहान चोपडाई आली कुठून हे न उलगडणारे कोडे आहे.

१३) केदारनाथांचे नामाभिदान हे दीर्घायु गर्गरुषीने केले की विमलाभुजेने ? या सारख्या अनेक असंख्य चुका या मालिकेमध्ये आहेत.