गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील फये येथे शेतीच्या कारणावरून एकास वडील-मुलाने खुरप्याने व काठीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवार सकाळी घडला. यामध्ये जखमी झालेल्या विठ्ठल आप्पासाहेब पाटील (वय ५०, मूळ गाव फये, सध्या रा. गारगोटी) यांनी भुदरगड पोलिसांत आज (बुधवार)फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग बाळू पाटील व वैभव पांडुरंग पाटील (रा. फये, ता. भुदरगड) या पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास विठ्ठल पाटील हे आपल्या फये येथील शेतात गेले असता संशयित पांडुरंग पाटील व वैभव पाटील हे पिता-पुत्र तिथे आले. त्यांनी गवतावर औषध फवारणी का केलीस, असे विचारत त्यांना शिवीगाळ केली. पांडुरंग पाटील याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर खुरप्याने मारले. तसेच वैभव याने त्यांना काठीने हातावर, पायावर जोरदार प्रहार केले. यामध्ये त्यांचे बोट फ्रॅक्चर झाले.