कोल्हापूर (प्रतिनिधी) : रजपूत वाडी येथे दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण करण्यात आली. विष्णू भगवान माने (वय ३२, रा. प्रयाग चिखली) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी त्याने शंकर आनंदा लोहार (रा. प्रयाग चिखली) याच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विष्णू माने हे आपली मुलगी आजारी असल्याने तिला औषध आणण्यासाठी रजपूत वाडी येथील मेडिकल दुकानांमध्ये गेले होते. या ठिकाणी माने यांच्या शेजारी राहणाऱ्या शंकर लोहार याने माने यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. माने यांनी लोहार यांना पैसे देण्यास नकार दिला. या रागातून शंकर लोहार याने विष्णू माने यांना बेदम मारहाण केली. त्यात माने गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी शंकर लोहार यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.