कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरतील सर्व फुटबॉल खेळाडू आणि सर्व संघाचा अनोखा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याला ४०० पेक्षा अधिक फुटबॉल शौकीन उपस्थित होते. त्यांच्याशी खासदार धनंजय महाडिक आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मनमोकळा संवाद साधला. तसेच फुटबॉल खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देण्याची खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली.

फुटबॉल पंढरी मँचेस्टर सिटी या लबचे प्रशिक्षण, त्यांचे प्रशिक्षक, खेळातील नवनवीन तंत्र, यशस्वी होण्याचे मंत्र याविषयीची एक सुंदर चित्रफितीचे स्क्रीनवर सादरीकरण झाले. कृष्णराज महाडिक यांनी गेल्या २ वर्षापासून फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, दरवर्षी के एम चॅम्पियन चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉलपटूंच्या अनेक समस्या आहेत. त्या जाणून घेवून, खेळाडू आणि फुटबॉल खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी, कृष्णराज महाडिक यांनी या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी नंतर मँचेस्टर सिटी या जगप्रसिध्द फुटबॉल क्लबच्या खेळाडूंचे खेळण्याचे तंत्र, तिथले स्टेडियम, खेळाडूंना मिळणार्‍या सेवा सुविधा, सरावाचे तंत्र, अपघातानंतर खेळाडूंसाठीच्या वैद्यकीय सुविधा, याविषयी माहिती देणारी चित्रफित सादर झाली. उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि तालीम संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी देखील संवाद साधताना, आपण परदेशी फुटबॉल जवळून पाहिला, अनुभवलाय. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. केवळ मैदान, प्रशिक्षक आणि चांगला आहार एवढयावर न थांबता, तर फुटबॉल खेळाडूंना चांगले मानधन मिळेल, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.