मुंबई (प्रतिनिधी) : खार परिसरातून ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ब्रिटिश नागरिक करण संजानी आणि राहिल फर्निचरवाला यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते. आता याच प्रकरणी एनसीबीने राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नोटीस पाठवली आहे.

२०० किलो ड्रग्स बाळगल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. यामधील मुख्य आरोपी करण संजानी आणि समीर या दोघांमध्ये २० हजार रुपयांचा ऑनलाईन व्यवहार झाल्याची माहिती चौकशीतून समोर आली होती.  त्यामुळे या दोघांमध्ये ड्रग खरेदी-विक्री झाल्याचा संशय असल्यामुळे एनसीबीने समीर खानला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. समीर खान यांचा संजानी व फर्निचरवाला यांच्याशी नेमका काय संबंध असून त्यांच्यात व्यवहार झाला आहे की नाही ?, याची चौकशी एनसीबीकडून करण्यात येणार आहे.