राशिवडे (प्रतिनिधी)  : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते; पण तो प्राणी तरस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाशी व नंदवाळच्या मध्यभागी असणाऱ्या जगताप मळ्यात वैरणीसाठी गेलेले शेतकरी व जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या लोकांना हा प्राणी आढळून आला आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच काही वेळापूर्वीच वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ परिसरात दाखल झाले होते. तिथे सापडलेल्या ठशावरून हा प्राणी बिबट्या किंवा वाघ नसून तरस असल्याचे वन खात्याकडून जाहीर केले आहे. त्यामुळे भीतीचे कारण नाही. वनक्षेत्रपाल विजय पाटील, रमेश कांबळे, वनरक्षक राहुल झेनवाल आणि रेस्क्यू टीमच्या वतीने याबाबत पाहणी केली.