सांगली : कॉंग्रेस हा देशाच्या गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात लढलेला हा पक्ष आहे.त्याला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे. सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे. मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे त्यामुळे सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका, अशा शब्दांत आमदार विश्वजीत कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे.

नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना विश्वजीत कदम यांनी आपली भूमिका मांडली. विश्वजीत कदम यांचे विमान गुजरातच्या दिशेने भरकटू नये, असा टोला राऊत यांनी आज सकाळी सांगलीत मारला होता. यावर त्यांनी दिल्लीतून सडेतोड उत्तर दिले. सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास त्याचा परिणाम महाराष्ट्रभर होईल, असा इशारा राऊत यांनी दिला होता. काँग्रेसला असला इशारा देऊ नका, अशा शब्दात विश्वजीत यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, “सांगली जिल्ह्यात जनावरांना जरी विचारले तरी ते सांगतील हा काँग्रेसचा जिल्हा आहे. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम यांनी सांगलीच्या मातीत परिश्रम घेऊन महाराष्ट्रात हा पक्ष मोठा केला. संपूर्ण महाराष्ट्र या वाटचालीचा साक्षीदार आहे. विशाल पाटील यांच्या रूपाने आम्ही सांगलीत एक सक्षम उमेदवार देत आहोत. आम्ही सांगलीतून लढणार अशी भूमिका सातत्याने मांडली आहे. मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे. त्याबाबत कोणी परस्पर निर्णय जाहीर करण्याचे कारण नाही. काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल.