कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाल्यांनतर महायुतीकडून अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची यावर अजून एकमत झालेलं नाही. पण ही जागा शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही जागांवर आपला दावा सांगितलं आहे. तर भाजपकडून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा बदलासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील उमेदवार बदलणार अशी चर्चा असताना खासदार संजय मांडलिक यांनी मात्र आपणच उमेदवार असल्याचे जाहीर करत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.  

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असणार? याचा शोध अजूनही सुरूच आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी उमेदवारीचा दावा केला असला, तरी भाजपकडून सुरू असलेल्या चाचपणीमुळे पुन्हा एकदा संशयाचे वातावरण तयार झालं आहे. पण आज संजय मांडलिक यांनी चर्चा कोणाच्याही नावाची असो उमेदवार मीच असणार आहे, असे वक्तव्य करून सर्वच चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

कोल्हापूरच्या उमेदवारीवर शिवसेना शिंदे गटांच्या खासदारांची  मुंबईमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. या बैठकीनंतर कोल्हापूरमध्ये परतल्यावर संजय मंडलिक यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेले 13 खासदार महायुतीचे उमेदवार असणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा मीच उमेदवार असेल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. माध्यमांमध्ये येत असल्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ते यावेळी म्हणाले. जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत पक्षातील इच्छुक प्रयत्न करतील, पण उमेदवार मीच असल्याचे ते म्हणाले. 

संजय मंडलिक म्हणाले की, शिंदेंना  पाठिंबा देणारा मी 12 वा खासदार होतो. त्यानंतर 13 व्या खासदाराने पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी उमेदवारीची ग्वाही दिली होती. आजही त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे मी पाठिंबा देणारा 12 वा असलो, तरी निश्चितच 12 वा खेळाडू नाही. मी पहिला खेळाडू आहे, असा मान मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे मी उमेदवारीसाठी निश्चित आश्वस्त आहे.