कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली मास्क नाही तर प्रवेश नाही आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम ‘बेस्ट’ ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देसाई यांनी’ मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही, सामाजिक अंतर नाही तर वितरणही नाही’ अशी अभिनव मोहीम सुरु केली. यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर यावर भर दिला आहे.
ग्राहकाने मास्क घातला नसेल तर दुकानदार त्याला प्रवेश देणार नाही आणि दुकानदारांने घातला नसेल तर ग्राहक वस्तू खरेदी करणार नाही. याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना दंड तसेच आस्थापना सीलबंद करण्यात येत आहेत. या मोहिमेचा मुख्यमंत्र्यांनी गौरव करुन राज्यात इतर जिल्ह्यांनीही याचे अनुकरण करण्याचे निर्देश दिले होते.